एसटी महामंडळाचा फुकट्या प्रवाशांना दणका   

३७ हजार ८७८ रुपयांचा दंड वसूल

सातारा : विनातिकीट प्रवास करणार्‍याविरोधात एसटी महामंडळाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. वर्षभरात सुमारे ६ भरारी पथकांमार्फत बसेसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १६९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये ३७ हजार ८७८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
 
एसटीने विविध सवलत योजना राबविल्या आहेत. शासनाने ७५ वर्षांच्या पुढील नागरिकांना मोफत एसटी प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांना ५० टक्के तिकिटामध्ये सवलत देणारी महिला सन्मान योजना सुरु केली. त्यामुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. महिला सन्मान योजनेमुळे महिलांसोबत पुरुषांची प्रवासी संख्या वाढली आहे. तिकिट न काढता प्रवास करणारेही आहेत. फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी महामंडळाच्या सातारा विभागाने सहा भरारी पथकांमार्फत वर्षभरात विविध मार्गावर एसटी बसेसची तपासणी करण्यात आली. १६९ फुकटचा प्रवास करणार्‍या प्रवाशांना एसटीच्या तिकीट तपासणीमार्फत पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून ३७ हजार ८७८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
 
विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांना तिकिटाच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये यापैकी जी मोठी रक्कम असेल ती रक्कम प्रवाशांना भरावी लागते. त्यामुळे दंडाची दुप्पट रक्कम भरण्यापेक्षा तिकीट काढून प्रवास करावा. मात्र कमी अंतराच्या प्रवासात अनेक प्रवाशी गर्दीच्यावेळी वाहकांना चकवा देतात, असे आढळून आले आहे.
 
विनातिकीट प्रवासकरणार्‍या प्रवाशांची संख्या आता कमी झाली असली तरी हा प्रकार पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. प्रवाशांनी तिकीट काढूनच एसटीमधून प्रवास करावा अन्यथा विनातिकीट प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 
 
- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक

Related Articles